दुसर्या स्वातंत्र्या कडे आगेकूच!
आपल्या "खाबूवीरां"नी भारतीय जनतेला लुटून स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करणे सोपे नाहीं कारण त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरणार नाहींत! आताशा तर हे चोरलेले पैसे शून्ये न वापरता 10^6, 10^8, 10^10 असे लिहायची गरज भासू लागली आहे. लहानपणी शिकलेली (पण कधीही न वापरलेली) अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंख, महाशंख, परार्ध असली एककें (units) नव्याने वापरावी लागत आहेत. गुंडांत लोकप्रिय असलेले "पेटी", खोका" हे शब्दही अपुरे पडत आहेत. 2G, CWG नंतर प्रचारात आलेले व याच 'खाबूवीरां'च्या 'सन्मानार्थ त्यांचीच नावे वापरून केलेले नवे अंकगणितच आता उपयोगी पडेल असे वाटते. (त्यात शेवटचे नांव कुणाचे होते हे बहुतेकांना आठवत असेलच.)
सध्या भल्या-भल्या नेत्यांना व त्यांच्या "पुण्यकर्मा"त सहभागी झालेल्या त्यांच्या साथीदारांना देशाची अगणित संपत्ति हडप केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली आहे. पण या संपत्तीचे जे आकडे वाचायला मिळतात त्यांचा हिशेब तोंडी तर सोडाच, पण सामान्य कॅलक्युलेटरवरही करता येणे शक्य नाहीं. त्यासाठी "स्प्रेडशीट"च वापरावा लागेल. ही हडप केलेली सर्व संपत्ती भारतीय जनतेची, दरमहा १० हजार ते लाखांपर्यंत पगार मिळविणार्या लोकांच्या करांतून जमविलेली आहे. तीच हडप केल्यामुळे ही जनता संतापल्यास नवल ते काय? पूर्वी एक-दोन लाख खाल्ले तरी "अबब" व्हायचे, पुढे कोटी रुपये खाल्ले तरी कांहीं वाटेनासे झाले. संवयच झाली म्हणा ना! मग चारा-घोटाळ्यापासून (fodder scam) हजार कोटींचा आकडा वाचनात येऊ लागला (व पचूही लागला). पण आता? "इतके लक्ष कोटी"पर्यंत मजल गेली. काय करणार आहेत ही नेतेमंडळी मंडळी या पैशांचे? त्यांना कांहीं लाज, लज्जा, शरम?
मला असेही वाटते कीं अकाउंटिंगच्या अभासक्रमात मूलभूत बदल करण्याची गरज असून त्यात असे हडप केले जाणारे पैसे कसे पकडता येतील या विद्येचा समावेश करायला हवा.
पण आपल्या सरकारचे रागरंग पहाता त्याला अद्याप जनतेच्या क्षोभाच्या तीव्रतेचा किंवा तो क्षोभ किती खोल आहे याचा अंदाजच आलेला नाहीं. कालची राजघाटावरील अण्णांच्या चिंतनाबद्दलची बातमी टीव्हीवर पाहिल्यावर असे वाटले कीं सरकारने नीट विचार केला नाहीं तर राजघाटाचा किंवा जयप्रकाश नारायण उद्यानाचा तेहरीर चौक व्हायला वेळ लागणार नाहीं. मनिष तिवारींचे अण्णासाहेबांच्या बाबतीत 'तुम' 'तुम्हारी' सारखे सौजन्यहीन उद्गार, कपिल सिब्बल यांच्या चेहर्यावरचे "अतिहुशारी" दर्शविणारे लबाड हास्य आणि अंबिका सोनींचे एकाद्या ४-५ वर्षाच्या मुलाला समजावे तसे जनतेला सांगणे म्हणजे कहरच झाला आहे असे वाटते.
पण अण्णांना उपोषण करायला बंदी घालून सध्याचे सरकार इंदिराजींचे अनुकरणच करत आहे असे दिसते. त्यांना या देशात पुन्हा आणीबाणी आणयची आहे काय? हे देशाचे तारू भरकटत कुठे न्यायचे आहे त्यांना? काय म्हणून उपोषण करण्याचा अधिकार अण्णांना हे सरकार नाकारीत आहे? आपल्याला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालेलेच नाहीं असे जे अण्णा म्हणाले ते खरेच आहे. फक्त "गोर्या इंग्रजां"च्या जागी "सावळे इंग्रज" आले! जी बंदी गोर्या इंग्रजांनी महात्मा गांधींच्या उपोषणावर घातली नाहीं ती बंदी हे गांधींचे नाव घेणारे आजचे "सावळे इंग्रज" आजच्या युगातल्या गांधींच्या नव्या अवताराला कां नाकारत आहेत? आणि ते आता बंदिवासातच उपोषणाला बसले आहेत. मग अटक करून सरकारने काय साधले? आज भारतभर-अगदी केरळ-तामिळनाडूपासून उत्तरेत हरियानापर्यंत व राजस्थानपासून आसामपर्यंत सारे लोक अण्णांच्या मागे उभे आहेत. एकादी ठिणगीच पडायचाच अवकाश आहे. मग असे पेटेल कीं कैरोतल्या तेहरीर चौकाचीच पुनरावृत्ती होईल.
मागे फिलिपीन्समध्ये जेंव्हां अशीच चळवळ कोरी अक्वीनोबाईंनी सुरू केली त्यावेळी असाच प्रचंड जनसमुदाय चौकात जमला होता. त्यातल्या महिलांनी मशीनगनधारक थायलंडच्या सैनिकांना गुलाबाची फुले दिली. ती कृती इतकी परिणामकारक ठरली कीं या सार्या सैनिकांनी निदर्शकांवर कारवाई करण्यास नापसंती दर्शविली. हळू-हळू ते कोरीबाईंच्या बाजूला येऊ लागले व शेवटी रामोस हे संरक्षणमंत्रीही कोरीबाईंना येऊन मिळाले. आज दिल्लीच्या गर्दीतही खूप भगिनी दिसत आहेत. त्यांनी या पोलिसांच्या व सैनिकांच्या हातात राखी बांधायला हवी. मग हे "बंधू" या निदर्शकांवर हल्ला करतील? काय बिशाद!
अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यासाठी २२ अटी? कशाला? एक नि:शस्त्र अहिंसावादी देशभक्त भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला उभा रहातोय् व तेही फक्त स्वत: अन्न नाकारून, तर यात पोलिसांना "सुरक्षे"ची काय समस्या दिसली? अतिरेक्यांना सोडून ते या आधुनिक महात्म्याच्या कां मागे लागले आहेत? आणि तीनच दिवसांची परवानगी काय म्हणून? आमरण उपोषण तीन दिवसात कसे संपेल? शिवाय ५००० पेक्षा जास्त लोक येणार नाहींत याची खात्री अण्णा कसे देतील? (खरे तर आज सकाळी झी आणि समय वाहिन्यांवर पाहिले कीं तिहारसमोर हजारोंच्या संख्येने लोक जमले आहेत. या जमावाच्या संख्येचे जर पोलिस स्वत:च नियंत्रण करू शकत नाहींत तर जेपी पार्कवर अण्णांनी ५००० पेक्षा जास्त लोक जमा होऊ देऊ नयेत ही अट घालणे म्हणजे एक लंगडी सबबच त्यांच्या तोंडावर फेकण्यासारखे आहे!) गर्दीचे योजनाबद्धपणे नियंत्रण करून ती व्यवस्था पोलिसांनाच करायला हवी! कार पार्कमध्ये ५० पेक्षा जास्त गाड्या किंवा दुचाकी वाहने चालणार नाहींत हीही जबाबदारी अण्णांची कशी? ती व्यवस्थाही पोलिसांनीच नको कां पहायला?
झी आणि समय वाहिन्यांवर पाहिले आताच घोषणा देणार्यांतील एकाने मनमोहन सिंग यांच्या लाल किल्ल्यावरून दिलेल्य़ा अभिभाषणातील "सरकारके पास कोई जादूकी छडी नहीं है कि वह एक मिनिटमे भ्रष्टाचार खतम करे"या वाक्याला उद्देशून म्हटले कीं "मगर हमारे पास अब झाडू है आप सबको निकाल देनेके लिये!"! बहुत खूब!
असे ऐकण्यात/वाचण्यात आलेले आहे कीं कुठल्याशा आतल्या आवाजाने "पुकार" दिल्यामुळे आपले सध्याचे पंतप्रधान श्री मनमोहन सिंग (त्यांच्याही ध्यानी-मनी नसताना) पंतप्रधान झाले. आता मनमोहन सिंग यांच्या आतल्या आवाजाने अशीच पुकार द्यायची वेळ आली आहे असे मला वाटते. हीच वेळ आहे योग्य धोरणाच्या समर्थनार्थ पायउतार होऊन जनतेच्या बाजूने उभे रहाण्याची. ही वेळ त्यांनी दवडली तर आयुष्यात एकाद्याच वेळेला येणारी सुवर्णसंधी हुकेल. उद्या ते फक्त माजी पंतप्रधान म्हणून ओळखले जातील, पण अण्णांबरोबर लढाईत उतरल्यास त्यांना "भारतहृदयसम्राट" ही जनतेच्या प्रेमाची उपाधी मिळेल जी "माजी पंतप्रधान" या बिरुदावलीपेक्षा अनेक पटीने मोठी आहे. ते असे करतील काय?
आज अण्णांच्या मागे उभा असलेला सबंध देश पाहिल्यावर "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे या श्लोकाची आठवण झाली व वाटले कीं भगवान श्रीकृष्णच तर नाहीं ना अण्णांच्या रूपात आपल्यात आले आहेत?
"सरकारचे डोके टिकाणावर आहे कां?" असे म्हणणार्या लोकमान्यांची आज उणीव भासते आहे. सरकारला सुबुद्धी सुचो व या "भ्रष्टासुरा"चा संहार होऊन "दुष्कृतां"चा विनाश होवो ही आशा करत आता पुढच्या शुभ वार्तेची वाट पाहू या!
No comments:
Post a Comment